मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मराठी भाषेत भरण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र ज्यांना मराठी भाषेत नामनिर्देशनपत्र भरणे अवघड जाते, त्यांना यापुढे आता इंग्रजी भाषेत नामनिर्देशनपत्र भरण्याची मुभा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त यांना लिखित पत्राद्वारे सदर बाब कळवली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, निवडणूक विभागाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासोबत 24 डिसेंबर रोजी बैठक घेतली होती. त्यावेळी, उमेदवारांनी इंग्रजी भाषेत नामनिर्देशनपत्र भरल्यास ते विचारात घेण्यात येईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या अनुषंगाने, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त यांचे 28 जानेवारी, 2012 च्या परिपत्रकाकडे लक्ष वेधले. राज्य निवडणूक आयोगाने जरी मराठी भाषेतील नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे नमुने उपलब्ध करून दिले असले, तरी सदर नमुन्यात इंग्रजी भाषेमध्ये माहिती भरून सादर करण्याची मुभा देण्यात येत आहे. याअनुषंगाने योग्य त्या सूचना सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना द्याव्यात, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांना दिले आहेत. उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्र/घोषणापत्राचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील नमुना विहित करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मराठी अथवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतून नमुन्यात शपथपत्र / घोषणापत्र सादर करण्याची मुभा द्यावी, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अवर सचिव नि. ज. वागळे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारांना इंग्रजी भाषेतही शपथपत्र / घोषणापत्र सादर करता येणार आहे.