Pimpri : टपाल सेवेतील पत्र होत आहे दुर्मिळ

नाणे मावळ : संदेशवहन अथवा दळणवळणाच्या क्षेत्रात झालेले बदल लक्षणीय आहेत. टेलिफोन, मोबाइल, इंटरनेट, ई-मेल यासारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने जग झटपट जवळ येत आहे. संदेशवहन जलदगतीने होऊ लागले आहे. परिणामी, भारतीय टपाल सेवेचे पत्र हा प्रकार दुर्मीळ होऊ लागला आहे.
सध्याचे युग हे गतिमान युग आहे. या गतिमान युगात फोन, मोबाइल यासारख्या संपर्क यंत्रणा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने गावोगावी, चौकाचौकांत टांगलेल्या लाल रंगाच्या टपालपेट्या आता शोपीस बनल्या आहेत. प्रत्येकाचे नातेवाईक, परिचित माणसे वेगवेगळ्या गावी राहतात. या नातेवाईकांना निरोप देणे, आमंत्रण देणे यासाठी आता सर्रास मोबाइल फोनचा वापर होतो. फार पूर्वी निरोप पाठविणारा माणूस पायी जात असे. कधी तो घोड्यावरून अथवा उंटावरून जात असे. परंतु इंग्रजांच्या काळात भारतात प्रथम टपाल व्यवस्था सुरू झाली. यामध्ये साध्या ५० पैशाच्या कार्डवर मजकूर लिहून ते पोस्टाच्या पेटीत टाकले जात. २ ते ३ दिवसांनी तो निरोप त्या व्यक्तीला मिळत असे.
शिवकालीन काळात छ. शिवाजी महाराजांनी प्रत्येक कामाच्यासंदर्भात आठ खाती तयार केली होती. त्याला अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. यामध्ये पत्रव्यवहार सांभाळणे हेही काम एका व्यक्तीला नेमून दिले होते. तो व्यक्ती आलेली पत्रे, आज्ञा, हुकूम इ. जपून ठेवणे किंवा एखाद्या राज्यात पत्र, आज्ञा किंवा आदेश घेऊन जाणे हे काम करीत असे. यासाठी मोठे मनुष्यबळ त्या खात्यात कार्यकरत होते.
आधुनिक युग हे डिजिटल युग आहे. डिजिटल स्वरुपात संदेश वहन करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा स्विकार सर्वत्र होत असल्याने पत्र लिहून पाठविणे हा पर्याय आपसूकच बाजूला पडला. मोबाईल फोनमधील विविध पर्याय हे संदेश वहनासाठी सोपे ठरत असल्याने त्याचा वापर होत आहे. पत्र व टपालसेवा यामुळे पाठीमागे पडत आहे. सध्या कार्यालयीन कामकाज किंवा काही सरकारी काम असेल तरच टपालसेवेचा उपयोग केला जातो.
– दत्तात्रय यादव, उद्योजक
इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाय रोवले. हळूहळू आपला देश ताब्यात घेतला. यावेळी इंग्रजांनी काही गोष्टी त्यांच्या सोयीसाठी सुरु केल्या. त्यात टपाल ही यंत्रणाही होती. टपालची भारतात असलेली गरज लक्षात घेवून त्यांनी टपालसेवा सुरू केली. टपालसेवेने पाठविलेल्या संदेशाला लगेच उत्तर मिळत नव्हते. परंतु संदेशवहनाची यंत्रणा यामुळे उपलब्ध झाली. अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत भारतात संदेशवहनासाठी टपाल पत्र हाच प्रमुख पर्याय होता. मात्र इंटरनेट व मोबाइल क्रांतीमुळे संपूर्ण चित्रच बदलून गेले.





