लोणी देवकरमध्ये बिबट्या आढळला

लोणी देवकर – इंदापूर तालुक्यात लोणी देवकर हद्दीत बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महामार्ग टापूतील गावे भयभीत झाली आहेत. तोंडेवस्तीनजीक बिबट्या कॅमेराबद्ध झाला आहे. त्यामुळे लोणी देवकर परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मागील काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. उजनी पाणलोट क्षेत्रातील वरकुटे बुद्रुक, कळाशी, गंगावळण आदी भागात मागील काही दिवसात बिबट्या आढळून आला होता. काही ठिकाणी बिबट्याने शेळ्या फस्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर इंदापूर वनविभागाने त्या परिसरामध्ये कॅमेरे लावून बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले होते.
परंतु बुधवारी (दि.28) रात्री त्या भागातून बिबट्याने इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून लोणी देवकर, पळसदेव हद्दीत प्रवेश केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत वनपाल जंक्शन अशोक नरुटे यांना याबाबत विचारले असता आम्ही घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. उजनीत पाणलोट क्षेत्रातील काळाशी, वरकुटे बुद्रुक क्षेत्रातील बिबट्या लोणी देवकर आणि पळसदेव हद्दीत आल्याची शक्यता यावेळी संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
आम्ही लोणी देवकरहून प्रवास करीत असताना आमच्या गाडी समोरून बिबट्या गेला. त्याचा आमच्याकडे व्हिडिओ आहे. याबाबत आम्ही वन विभागाला कळविले आहे.
– अमोल देवकर, प्रत्यक्षदर्शी, लोणी देवकर.





