पुणे जिल्हा | कोंबड्या, कुत्रे फस्त करणारा बिबट्या जेरबंद

नारायणगाव, (वार्ताहर) – मांजरवाडी (ता. जुन्नर) परिसरातील कोंबड्या व कुत्रे फस्त करणारा बिबट्या शिंदे मळ्यातील बबुशा थोरात व विठ्ठल शिंदे यांच्या घराजवळ ठेवलेल्या पिंजर्यात शुक्रवारी (दि. 16) रात्री जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मादी बिबट्या अत्यंत आक्रमक असून अंदाजे दोन वर्ष वयाची आहे.
बिबट्याने मांजरवाडी परिसरात मागील आठवड्यात 20 कोंबड्या फस्त केल्या होत्या तर पाळीव कुत्रे व माणसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
जेरबंद केलेल्या पिंजर्यात बिबट्याने रात्रभर उड्या मारून तोंडाला जखम झाली असल्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. जुन्नर वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मांजरवाडी परिसरात जास्तीत जास्त पिंजरे लावण्याची मागणी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे होत आहे. परंतु वनविभागाला एकाच गावात जास्तीचे पिंजरे लावण्याचा निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. मांजरवाडी भागात बिबट्यांचा वावर असल्याने बिबट्यांचा हॉटस्पॉट निर्माण झाला आहे.
घराबाहेर कोंबडी पालन करताना कोंबड्यांकरिता चांगले पक्के शेड करणे गरजेचे आहे. अन्यथा बिबट्या हलक्या शेडमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वनविभाग जुन्नर यांच्या निदर्शनास आले आहे.





