प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसात वर्षाविहार करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे फुलली असून येथील व्यावसायिक यामुळे आनंदी आहेत. शनिवार आणि रविवारी संपूर्ण मावळातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी आले होते. गेल्या काही दिवसांपासून पर्यटक प्रसिद्ध पर्यटन स्थळांसोबत मावळच्या आतील दुर्गम भागातील निसर्गाने नटलेल्या स्थळांना देखील भेट देत आहेत. यामुळे केवळ एक-दोनच नव्हे तर अनेक ठिकाणी मावळवासीयांना रोजगार उपलब्ध होत आहे.सध्या मावळ तालुक्यात मान्सूनचा जोरदार पाऊस पडत आहे या पावसाने मावळच्या डोंगरी भागातील उतारावरून मोठमोठे ओढे नाले आणि धबधबे भरभरून वाहत आहेत. या धबधब्याखाली भिजण्यासाठी व वर्षाविहार करण्यासाठी मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणावरून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा, कार्ला, भाजे, पवनानगर, अंदर मावळ, नाणे मावळ या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. या पर्यटकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक तसेच चहा, वडापाव, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसे आदी खाद्यपदार्थाच्या व्यावसायिकांना यामुळे मोठा व्यवसाय मिळत आहे. तर हॉटेल व्यवसायिकांचाही चांगला धंदा होत आहे. त्यामुळे हे सर्व व्यावसायिक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. गर्दी आणि वाहतूक कोंडी पुणे मुंबई महामार्गावर या पर्यटकांच्या वाहनामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. या पर्यटकांच्या वाहनांमुळे पुणे मुंबई महामार्गावरील धाब्यांवरही प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. तर सोमाटणे फाटा, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, कार्ला या ठिकाणच्या महामार्गावर वाहनांमुळे वाहतूक कोंडी जाणवत होती.