भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त मोठी गर्दी; अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन

Bhima-Koregaon Vijay Stambh | भीमा कोरेगाव येथे 208 व्या शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आज मी अभिवादन करण्यासाठी आलो आहे. प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या आयोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढेल, असेही अजित पवार म्हणाले. याशिवाय प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले. Bhima-Koregaon Vijay Stambh |
आज भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्या ऐतिहासिक लढाईतील शूरवीरांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
#भिमा_कोरेगाव_शौर्यदिन pic.twitter.com/wRSSZOp852
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 1, 2026
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाकडून विशेष खबरदारी
दरम्यान, शौर्य दिनानिमित्त परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा ऐतिहासिक दिवस साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. Bhima-Koregaon Vijay Stambh |
हेही वाचा:
न्यूयॉर्कसाठी ऐतिहासिक क्षण ! कुराण घेऊन जोहरान ममदानी घेणार महापौरपदाची शपथ




