शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी नेवासा तहसिल कार्यालयावर शेतकरी संघटनेकडून उपोषण

नेवासा (प्रतिनिधी) : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत सन २०२३ – २०२४ या खरीप हंगामातील पीक विमा ओरिएंटल विमा कंपणीकडून शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत असल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयावर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अजित काळे यांच्या नेत्तृत्वाखाली मंगळवार (दि.१०) रोजी सकाळी ११ वाजता उपोषण सुरु केले. या उपोषणात तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपोषणस्थळी विविध शेतकरी नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सडकून टिका करत म्हणाले की, नेवासा तालुक्यात सलग २१ दिवसांपेक्षा अवर्षण काळ झाल्याने नेवासा तालुक्यातील ८ मंडळे विम्यास पात्र झालेले आहेत. त्यामुळे सदरची विमा रक्कम यापुर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे असताना केंद्र व राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण देवून विमा कंपणीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे यावेळी शेतकरी नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना खदखद व्यक्त केली.
पीक विमा योजना म्हणजे सर्वात मोठा अर्थिक घोटाळा असून यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार व पीक विमा कंपनीच्या संगणमताने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामध्ये सर्व शासकिय यंत्रणेची दप्तर दिरंगाई झाल्यामुळे तालुक्यातील चार मंडळांना २५ टक्के अग्रिम विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली ही मोठी फसवणूक असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलेला असून सरकारने या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाहीतर राज्यव्यापी आंदोलन करु असा खणखणीत इशाराही यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.
या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जेष्ठ अभ्यासू विधीज्ञ अजित काळे,जिल्हा उपाध्यक्ष हरिअप्पा तुवर,नेवासा तालुकाध्यक्ष मेजर अशोकराव काळे,युवा तालुकाध्यक्ष रोहित कुलकर्णी,कायदेशीर सल्लागार विधीज्ञ बाळासाहेब कावळे,तालुका संपर्कप्रमुख नरेंद्र काळे,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे,अजितराव तुवर,विश्वास मते,किरण लंघे,अशोकराव तुवर,रमेश शिंदे,वामनराव तुवर,संतोष साळुंखे,विक्रांत पवार,विजय माळी यामच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपोषणार्थींकडून मौजे सुरेगांव गंगा ते नेवासा हा रस्ता गावाजवळ ४० ते ५० फुट लांबी व ३ ते ४ फुट खोली असलेला खड्डा दुरुस्त करुन मिळवा तसेच बोरगांव ते नेवासा हा रस्ता दळणवळणासाठी डांबरीकरण करण्याची मागणी यावेळी केली.





