घरोघरी सर्वेक्षणात सापडले 3 हजारांवर बाधित

पुणे – शहरात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि व्याधी असलेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची मागील दीड महिन्यांत प्रत्यक्ष घरी जाऊन पाहणी केली. त्याद्वारे ताप, सर्दी, खोकला, दम लागणे अशी लक्षणे असलेल्या 9 हजार 299 संशयितांना दवाखान्यात दाखल केले असता, त्यापैकी 3 हजार 85 नागरिक बाधित असल्याचे आढळून आले.
करोनामुळे पुणे शहरात दररोज 35 ते 45 जणांचा मृत्यूची नोंद होत आहे. मागील पंधरा दिवसांत मृत्यूचा दर वाढत असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि विविध व्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा यासह अन्य) असलेल्यांचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे व्यक्ती, इतर व्याधी आणि गरोदर माता यांचे सर्वेक्षण करण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यासाठी 1 हजार 420 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दि.7 जुलै ते 26 ऑगस्टदरम्यान (1 महिना 19 दिवस) केलेल्या सर्वेक्षणात पथकाने 8 लाख 78 हजार 987 घरांना भेटी देवून 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आणि इतर व्याधी असलेल्या 2 लाख 85 हजार 317 जणांची थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे ताप, श्वासोच्छ्वास यांची तपासणी करण्यात आली. वेळीच निदान झाल्याने पुढील संसर्ग वाढण्याची भीती कमी झाली, असे प्रशासनाने म्हटले आहे.
तब्बल 81 हजार जणांना मधुमेह महापालिकेने केलेल्या 2 लाख 85 हजार 217 जणांच्या सर्वेक्षणात उच्च रक्तदाबाची व्याधी असलेल्यांची संख्या अधिक आहे. तब्बल 96 हजार 252 म्हणजेच सर्वेक्षणाच्या तुलनेत 33.75 टक्के या व्याधीने त्रस्त आहेत. त्यानंतर 80 हजार 971 जणांना मधुमेहाचा आजार आहे. साधारण 28.39 टक्के प्रमाण आहे. तर 1 हजार 308 जणांना अस्थमाचा आजार असून, इतर आजार आणि जोखीमग्रस्त गरोदर माता याचे प्रमाण 78 हजार 618 इतके असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.





