Nira River : ‘माऊली… माऊली…’च्या अखंड गजरात नीरा स्नान; विणेकरांना लाभले पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य
Nira River : पादुकांचा स्पर्श होताच अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

नीरा : परतीच्या आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोमवारी सकाळी नीरा येथे दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. नीरा नदीच्या दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांचे पारंपरिक निरास्नान पार पडले. त्यानंतर हजारो विणेकरांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. यावेळी “माऊली… माऊली…” आणि “ज्ञानबा-तुकाराम”च्या अखंड गजरात भावनांचा अविस्मरणीय सोहळा अनुभवायला मिळाला.
पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेला पालखी सोहळा सकाळी साडेआठच्या सुमारास नीरा येथे पोहोचला. दत्त घाटावर विधिवत पूजन करून पवित्र नीरा नदीच्या जलाने माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी हजारो वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. नदीकाठी घुमणारा हरिनामाचा गजर आणि भक्तांच्या जयघोषाने परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. (Nira River)
निरास्नानानंतर पार पडणारी विणेकरांना पादुकांच्या स्पर्शदर्शनाची परंपरा हा या सोहळ्याचा सर्वाधिक भावनिक क्षण ठरला. ब्रिटिशकालीन पुलावर पालखीचा रथ उभा करण्यात आल्यानंतर दिंड्यांमधील विणेकरी क्रमाने उभे राहिले. त्यानंतर माऊलींच्या पादुका प्रत्येक विणेकरापर्यंत नेण्यात आल्या. वारकरी संप्रदायात हा क्षण म्हणजे प्रत्यक्ष माऊली आपल्या भेटीला आल्याची अनुभूती मानली जाते. (Nira River)
Weather Update: राज्यात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पादुकांचा स्पर्श होताच अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर “माऊली भेटल्या… वारी धन्य झाली” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ही परंपरा काही वर्षांपूर्वी बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र वारकरी संप्रदायाच्या आग्रहामुळे शतकानुशतके सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे.

Nira River : ‘माऊली… माऊली…’च्या अखंड गजरात नीरा स्नान; विणेकरांना लाभले पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य
यंदा नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या सोहळ्याला वेगळेच आकर्षण लाभले. वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे दत्त घाट पाण्याखाली गेला होता. वेगाने वाहणारी नीरा नदी, ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करणारा पालखी रथ, पुढे-मागे चालणाऱ्या दिंड्या आणि “माऊली… माऊली…”च्या अखंड गजराने भक्ती, निसर्ग आणि परंपरेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. (Nira River)
निरास्नानाचा सोहळा संपल्यानंतर पालखीने नीरा येथील विठ्ठल मंदिरात अल्प विश्रांती घेतली. दुपारी दोन वाजता हा सोहळा महर्षी वाल्मिकींची नगरी असलेल्या वाल्हे येथील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार असून, त्यानंतर संत सोपानकाकांच्या सासवड येथे मुक्काम करून पालखी पुढे पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
परतीची वारी असली तरी वारकऱ्यांच्या भक्तिभावात आणि उत्साहात कोणतीही कमी जाणवत नव्हती. प्रत्येकाच्या ओठांवर एकच जयघोष घुमत होता “माऊली… माऊली… ज्ञानबा-तुकाराम!” (Nira River)
हेही वाचा:





