Shakeela : मोबाईलच्या अतिवापराची मोठी किंमत! अभिनेत्रीच्या मानेची शस्त्रक्रिया; नसांवर झाला गंभीर परिणाम
Shakeela : परिस्थिती इतकी बिघडली की तिला शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेसाठी तिला ३ लाख रुपयांचा खर्च आला.

Shakeela : साऊथ अभिनेत्री शकीला हिला मोबाईलचा अतिवापर चांगलाच महागात पडला आहे. नुकतीच तिच्या मानेवर शस्त्रक्रिया पार पडली असून, चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबाबत माहिती दिली. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर शकीलाने तिच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओद्वारे नेमकी तिला शस्त्रक्रिया का करावी लागली याबाबतचे कारण सांगितले.
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिला नेक कॉलर वापरण्याचा सल्ला दिला असून, व्हिडिओमध्ये ती कॉलर घातलेली दिसते. व्लॉगमध्ये रुग्णालयातील काही क्षणांसह घरी परतल्यानंतरचे दृश्यही दाखवण्यात आली आहेत. शकीलाच्या म्हणण्यानुसार, एका कुशीवर तासनतास झोपून मोबाईलवर गेम खेळण्याच्या सवयीमुळे तिच्या मानेतील नसांवर याचा गंभीर परिणाम झाला. परिस्थिती इतकी बिघडली की तिला शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेसाठी तिला ३ लाख रुपयांचा खर्च आला.
साध्या कामांसाठी घ्यावी लागते मदत
आपला अनुभव सांगताना शकीला म्हणाली, “फोन अत्यंत उपयुक्त साधन आहे, पण त्याचा अतिरेक करू नका. माझी नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे लोकांनी यापासून धडा घ्यावा.” असा सल्ला तिने चाहत्यांना दिला. तसेच तिला अंथरुणातून उठणे किंवा जेवण करणे यांसारख्या साध्या कामांसाठीही इतरांची मदत घ्यावी लागत आहे.
तिने पुढे सांगितले की, ती अनेकदा सलग चार-चार तास एका बाजूला झोपून मोबाईलवर गेम खेळत असे. मधे फक्त चहा किंवा कॉफीसाठी उठून पुन्हा त्याच सवयी सुरू होत. याशिवाय यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्यातही ती बराच वेळ घालवत असे. मोबाईल्या अतिवापरामुळे तिच्या मानेतील महत्त्वाच्या नसांवर ताण आला आणि तिला शस्त्रक्रिया करावी लागली.
शकीलाने पालकांनाही सावध राहण्याचे आवाहन केले. मुलांच्या हातात विनाकारण मोबाईल देऊ नका, असा सल्ला देत ती म्हणाली, “फोनचा वापर केवळ आवश्यक कामांसाठी करा. निरुपयोगी व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवू नका. अन्यथा माझ्यासारख्या वेदना सहन कराव्या लागू शकतात आणि मोठा आर्थिक खर्चही करावा लागू शकतो.”
शकीला कोण आहे?
आंध्र प्रदेशातील नेल्लोरजवळ जन्मलेल्या शकीला सी. बेगम यांनी अनेक चित्रपटांमधील भूमिकांमुळे लोकप्रियता मिळवली. दिग्दर्शक आर. जे. प्रसाद यांच्या ‘किन्नरथुंबिकल’ (२०००) या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. हा चित्रपट प्रचंड गाजला. अवघ्या १२ लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने सुमारे ४ कोटी रुपयांची कमाई केली. या यशामुळे शकीला केरळमधील पॉप-कल्चर आयकॉन बनल्या आणि ‘शकीला वेव्ह’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रियतेची लाट निर्माण झाली.
त्यानंतर काही वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवले. विशेषतः मल्याळम चित्रपटसृष्टीत त्यांचे चित्रपट अनेक प्रमुख पुरुष कलाकारांच्या चित्रपटांनाही मागे टाकत होते. मात्र, हा सुवर्णकाळ फार काळ टिकला नाही. शकीलाने मोहनलाल यांच्या ‘छोटा मुंबई’ (२००७) आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘तेजा भाई अँड फॅमिली’ (२०११) यांसारख्या चित्रपटांतही छोटी भूमिका साकारली आहे.
मल्याळमसोबतच त्यांनी तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ‘मारू मालार्ची’, ‘थोट्टी गँग’, ‘जयम’, ‘मोनालिसा’, ‘बंगाराम’, ‘अझगिया तमिळ मगन’, ‘शिवा मनसुला शक्ती’, ‘बॉस एंगिरा भास्करन’, ‘वसुवुम सरवणनुम ओन्ना पडिचावंगा’ आणि ‘मध गजा राजा’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.





