छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक उभारावे : मुख्यमंत्री

पुणे : “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे,’ अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा बुधवारी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अशोक पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, स्मारक याबाबत मोठे आकर्षण आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा.
विविध प्रकल्प प्रस्तावित
भीमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे 4 एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार आहेत. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्प, ऍम्फीथिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौर ऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.





