विक्रम गोखले यांचा जन्म पुणे येथे 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. त्यांनी विविध नाट्य-चित्र, सिनेमे, हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. सन 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता. सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत होते. सामाजिक कार्याचे बाळकडू या झगमगत्या विश्वात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या विक्रम गोखले यांच्या सामाजिक जाणीवा प्रखर होत्या. हेच त्यांचं वेगळेपण होतं. गोखले अनेक सामाजिक कार्यात कधी प्रत्यक्षपणं तर कधी अप्रत्यक्षपणं सहभागी व्हायचे. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री कमलाबाई गोखले, वडील आणि प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्याकडून मिळाला होता. अभिनयासोबतच दोघांच्या सामाजिक कामाचा वारसाही त्यांना मिळाला होता. आजी आणि वडिलांचा कित्ता गिरवत गोखले भारतीय सैनिकांसाठी आर्थिक मदत करायचे. विक्रम यांचे वडील चंद्रकांत गोखले दरवर्षी युद्धात अथवा सीमेवर जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करायचे. त्यासाठी त्यांनी बॅंकेत ठराविक रक्कम ठेवलेली होती. त्या रकमेवरील येणाऱ्या व्याजातून ही आर्थिक मदत ते करायचे. परंतु काळानुरूप व्याजदर कमी झाल्यानंतर चंद्रकांत गोखले यांनी काटकसरीनं रहायला सुरुवात केली. त्यातून अव्याहत मदत केली. वडिलांचा हाच कित्ता विक्रम गोखले यांनीही गिरवला. इतकंच नाही तर त्यांनी आपली आजी कमलाबाई यांच्या नावानं ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी काम केलं जायचं. अपंग मुलांचं पुनर्वसन केलं जातं. गाजलेले मराठी चित्रपट मॅरेथॉन जिंदगी (2017) आघात आधारस्तंभ आम्ही बोलतो मराठी कळत नकळत (1991) ज्योतिबाचा नवस दरोडेखोर (1980) दुसरी गोष्ट (2014) दे दणादण नटसम्राट (2015) भिंगरी (1977) महानंदा (1985) माहेरची साडी (1991) लपंडाव (1993) वजीर वऱ्हाडी आणि वाजंत्री (1973) वासुदेव बळवंत फडके सिद्धान्त वृद्ध कलाकारांसाठी हक्काचा निवारा उतारवयात ज्येष्ठ कलाकारांची फरफट होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काही तरी करावं असं विक्रम गोखले यांच्या मनात होतं. त्यातूनच त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा 1 एकराचा प्लॉट दिला. बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत ही 2.5 कोटी रुपयांहून अधिक आहे. या जागेवर ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि हक्काचा निवारा मिळणार आहे. हा आश्रम विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली उभा केला जाणार असल्याचं अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. गोखले यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यानं सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहित त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. नाना पाटेकरांनी सांगितलेला किस्सा विक्रम यांच्या सामाजिक जाणिवांबद्दल प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. नानांनी सांगितलं की, “विक्रम गोखले आणि मी एका नाटकाच्या दौऱ्यानिमित्तानं परदेशात गेलो होतो. तिथं रोज आम्हाला दोन वेळच्या जेवणाचे पैसे दिले जायचे. परंतु गोखले दिवसातून फक्त एकदाच जेवायचे एका जेवणाचे पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. परदेशातून आम्ही जेव्हा परतलो तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे जमा झालेली रक्कम सामाजिक कामासाठी दिली होती. मिळालेले पुरस्कार “अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी 2013 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (2015), चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या “मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव वृषाली. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 70 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. गाजलेली नाटकं एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना आणि नकळत सारे घडले ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच “विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याच्या निधनाने कलाक्षेत्राची हानी झाली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ते मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला. त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला. – शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले होते. – छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालते बोलते विद्यापीठ हरपले. – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री विक्रम गोखले यांची अनेक विषयांवर ठाम मते असत, एक कसदार राजबिंडे अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात त्यांची तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. – राज ठाकरे, पक्षप्रमुख मनसे माझ्या आयुष्यातला मोठा आधार गेला. ज्यांच्याकडे बघत मी अभिनय शिकलो. माझा दुसरा गुरूही गेला. – शरद पोंक्षे, प्रसिध्द अभिनेते विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो, असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही… भावपूर्ण श्रध्दांजली..! – नाना पाटेकर, अभिनेते विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील! जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता कॅमेराला डबल लूक देईल. तेव्हा तुमची उणीव भासेल. – डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे सुरु ठेवत सर्व घटकांना विविध मार्गाने ते निधी देत आले. परंतु, दातृत्वाचा त्यांनी बोलबाला केला नाही. सिंटा आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या दोन्ही संस्थांनी संयुक्तरीत्या वृद्धाश्रम उभा करावा यासाठी विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यशवंत गायकवाड यांनी त्यांची दोन एकर जागा देण्याचे निश्चित केले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या जागेवर कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभा करण्याची. हे काम पूर्णत्वास नेणे हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली. – मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अ. भा. म. चित्रपट महामंडळ गाजलेले हिंदी चित्रपट अकेला (1991) अग्निपथ (1990) अधर्म (1992) आंदोलन (1995) इन्साफ (1987) ईश्वर (1989) कैद में है बुलबुल (1992) क्रोध (1990) खुदा गवाह (1992) घर आया मेरा परदेसी (1993) चॅंपियन (2000) जख़मों का हिसाब (1993) जज़बात (1994) जय बाबा अमरनाथ (1981) तडीपार (1995) तुम बिन (2001) धरम संकट (1991) परवाना (1971) प्रेमबंधन (1979) फलक द स्काय (1988) बदमाश (1998) बलवान (1992) मुक्ता (1994) यही है जिंदगी (1977) लाईफ पार्टनर (2009) लाड़ला (1994) वजीर (1994) स्वर्ग नरक (1978)