Pandharpur Wari 2025 : अत्यंत निंदनीय प्रकार..! माऊलींच्या पालखीत महिला वारकऱ्याला ढकलले; व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्स संतप्त

Pandharpur Wari 2025 : महाराष्ट्रात पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, लाखो वारकरी विठ्ठल भक्तीच्या ओढीने पंढरीच्या दिशेने पायी चालत आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांचा सोहळा भक्तीमय वातावरणात मार्गक्रमण करत आहे.
ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता वारकरी दिंडी, रिंगण आणि अवघड घाट पार करत माऊलींच्या गजरात पुढे सरकत आहेत. मात्र, या भक्तीमय वातावरणाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील एका चोपदाराने महिला वारकऱ्यासोबत उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटीझन्समध्ये संतापाची लाट पसरली आहे.
व्हायरल व्हिडिओमधील धक्कादायक घटना
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज, 3 जुलै 2025 रोजी सकाळी वेळापूरहून प्रस्थान करून उघडेवाडी येथे पोहोचला. येथे माऊलींचे ऊभे रिंगण पार पडले. रिंगणानंतर काही महिला वारकरी डोक्यावर पितळी तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. यावेळी पालखीतील मुख्य चोपदाराने अचानक एका महिला वारकऱ्यास जोरदार ढकलले.
या धक्क्याने ती महिला गोल रिंगणात समोर बसलेल्या माऊलींच्या आंगावर पडली. विशेष म्हणजे, या महिलेच्या डोक्यावरील पितळी तुळस जर कोणाला लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. तरीही चोपदाराने आपला उद्धटपणा थांबवला नाही आणि जोरजोराने ओरडत त्या महिलेशी वाद घातला.
View this post on Instagram
वारीच्या शिस्तीला गालबोट
संत ज्ञानेश्वर महाराजांना ‘माऊली’ म्हणजेच आई असे संबोधले जाते, आणि त्यांच्या पालखीतच एका महिला वारकऱ्यासोबत अशी वागणूक मिळणे अत्यंत दुखद आहे. वारी ही वैष्णव परमपरेतील भक्ती, समता आणि सेवाभावाचा उत्सव आहे, परंतु या चोपदाराच्या कृत्याने या मूल्यांना धक्का लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटीझन्सनी चोपदाराच्या या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नेटीझन्सचा संताप आणि मागणी
व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी “माऊलींच्या पालखीत अशी वागणूक? ही शिकवण विसरले का?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच चोपदारावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. “वारी म्हणजे भक्ती आणि प्रेमाचा संगम, मग अशा उद्धटपणाला येथे स्थान कसे?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी पालखी प्रशासन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीला या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पालखीच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा आळंदीपासून सुरू होऊन 20 दिवसांत 250 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचतो. यंदा 19 जून 2025 रोजी आळंदीतून निघालेली ही पालखी 6 जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पालखीचे व्यवस्थापन हायबतरावबुवा आरफळकर यांच्या वंशजांनी आणि आळंदी देवस्थान ट्रस्टद्वारे केले जाते. अशा परिस्थितीत चोपदाराच्या या वर्तनाने पालखीच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, पालखी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. वारीच्या पवित्रतेला आणि भक्तीच्या भावनेला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, असे मत नेटीझन्स व्यक्त करत आहेत.





