शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पारनेर -अडीच लाख रुपयांच्या कर्जावर साडेसात लाख रुपये व्याज देऊनही सावकार लिहून दिलेली जमीन परत करत नसल्याने, सहायक निबंधकांकडून, तसेच पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या म्हसणे येथील सुनील शंकर नगरे या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी काडी पेटविण्यापूर्वीच नगरे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
या संदर्भात नगरे यांनी सांगितले की, उख्खलगाव (ता. श्रीगोंदे) येथील महिला सावकार व रांजणगाव मशीद (ता. पारनेर) येथील पुरुष सावकाराकडून 2 लाख रुपये व्याजाने घेतले होते. पैसे घेण्यापूर्वी सावकारांनी नगरे यांचे म्हसणे येथील क्षेत्र स्वतःच्या नावावर करून घेतले होते. पैसे परत केल्यानंतर हे क्षेत्र पुन्हा नगरे यांच्या नावावर केले जाईल, अशी नोटरीही सावकारांनी करून दिली होती.
तरीही सावकारांनी त्यांची जमीन नावावर करून देण्यास नकार दिला. उलट रांजणगाव मशीद येथील सावकाराने साठ लाखांची मागणी केली. या सावकारांविरोधात सहायक निबंधकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी छापा टाकला. त्यानंतर दोन्ही सावकार, तसेच सहायक निबंधकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही नगरे यांनी केला आहे.





