जांबुत, (वार्ताहर)- लोकसभा निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली असून निवडणूक प्रचारासाठी एलईडी स्क्रीन असलेली वाहने गावागावात चित्रफितीद्वारे प्रचार करताना दिसत आहेत. मात्र ऐन एप्रिलच्या कडक उन्हाच्या चटक्यामध्ये एकीकडे शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त असताना गावात दुपारी चित्रफीत पहाण्यासाठी मतदारांकडूनही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे (दि.२) दुपारी साडेबाराच्या दरम्यान एका उमेदवाराचे प्रचाराचे एलईडी स्क्रीन असलेले वाहन चौकात उभे राहिले. यावेळी उमेदवाराच्या मागील पाच वर्षातील केलेल्या कामगिरीची चित्रफीत एलईडी स्क्रीनवर सुरु होती. भर दुपारी कडक उन्हाच्या चटक्याने आणि कडक असाहाय्य झळांनी अंगाची काहीली होत असल्याने कडक उन्हात चित्रफीत पहाण्याकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाठ फिरवली आहे. कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून कडक उन्हाळ्याची चाहूल लागली असताना शेतकरी दिवसभर कांदा पिकाची काढणी करण्यात व्यस्त आहेत. अशावेळी लोकसभा निवडणुक उमेदवारांच्या कामाची चित्रफीत दाखवणारी एलईडी स्क्रीन प्रचाराची वाहने गावातील गावठाणात पहायला मिळत आहे. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने या प्रचाराकडे शेतकऱ्यांचे सध्या दुर्लक्ष आहे. निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच प्रचार करावा लागणार असे दिसत आहे. प्रचाराचे नियोजन कोलमडणार सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चाळीशीपार केलेला आहे. त्यातच शेतकरी सकाळपासून शिवारात आहे. शेतीची कामे उरकून तो संध्याकाळी विसावतो. दररोजच्या रोजीरोटीसाठी दोन हात करणारा शेतकरी सध्या निवडणुकीपासून दूरच राहिला आहे. कडाक्याचा पारा हा सर्वसामान्यांसह राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचाराचे नियोजन करताना दमछाक होत आहे. अजूुन निवडणूक प्रक्रिया, मतदानाला अवधी असला तरी प्रत्येक गावांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. कांदा उत्पादक निराशेच्या गर्तेत केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. तसेच या परिसरात कांदा उत्पादक शेतकरी आहे. निर्यातबंदीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. यात हातातोंडाशी आलेला कांदा पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी भरउन्हात कामे करीत आहेत. सध्या विरोधकांकडून कांदा निर्यातबंदीचा मुद्दा शिरूर लोकसभा मतदारसंघात उमटण्याची शक्यता आहे.