लोकनेत्यांच्या स्मारकासंदर्भात दुटप्पी खेळी

सातारा -शिवतीर्थ परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई याचे स्मारक करायला खा. उदयनराजेंचा विरोध नाही, तर समर्थकांना निवेदन द्यायला कशाला पाठवले होते? एकीकडे मंत्री शंभूराज देसाई यांचा वाईटपणा घ्यायला नको, म्हणून स्मारकाला विरोध नाही, असे ते सांगतात आणि शिवप्रेमींचा वाईटपणा नको म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकाना निवेदन देण्यासाठी समर्थकांना पाठवतात. म्हणजे ते एकाच वेळी सगळ्यांना खेळवत ठेवत आहेत, अशी टीका आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकनेते बाळासाहेब देसाई हे राज्यातील मोठे नेते होते. मीसुद्धा काल (दि. 18) शंभूराज देसाईंना विनंती केली की, तुम्हीच सामंजस्य दाखवून आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करुन, शिवतीर्थावर आयलॅंड (चौक) न करता, अन्यत्र पाहिजे तेथे करावा. उदयनराजेंच्या म्हणण्यानुसार मी बेअक्कल आहे, ते मान्य; परंतु तुम्ही एवढे विद्वान आहात, तुमची एवढी बुद्धिमता आहे, तुम्ही लोकांमध्ये राहता, लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, तर एवढ्या विद्वान माणसाचा लोकसभेला पराभव का झाला, याचे उत्तर द्यायचे की नाही, हे त्यांनीच ठरवावे. मला जे जाणवले, जे दिसले, ते मी बोललो. मी कालही बोललो की, शंभूराज देसाई आणि उदयनराजे यांच्यात “इगो वॉर’ आहे. एकीकडे भिंतीवर पेंटिंग काढले, म्हणून दुसरीकडून आयलॅंडचा विषय पुढे आला. शिवतीर्थावरील आयलॅंडला माझा विरोध नाही, असे उदयनराजे म्हणाल्याचे आज माझ्या ऐकण्यात आले. मग, ऍड. दत्ता बनकर आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला कागेले होते.
मंत्री शंभूराज देसाई आणि शिवभक्तांचाही वाईटपणा नको म्हणून, तिकडे कार्यकर्ते पाठवून निवेदन द्यायचे. एका वेळेला सगळ्यांना थोडे मधाचे बोट लावून, सगळ्यांना थोडे थोडे खूश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, लोकसभा निवडणूक जवळ यायला लागल्यावर उदयनराजे कोणाचेही ऐकतील. त्यांच्याबाबत जे अनुभव आहेत, त्यावरुन मी बोलत आहे.
शिवतीर्थाच्या खालच्या बाजूला उदयनराजेंचा मार्केट कमिटीचा उमेदवार गुरसाळे हा अतिक्रमण करुन, रोज रात्री मासे शिजवून विकतो, तरीही सारे कसे गप्प बसतात? भूमाता दिंडी काढून किती वर्षे झाली? त्यानंतर ते तीन वेळा खासदार झाले. कोयनेची वीज त्यांना अडवता आली का? केंद्रात होता. काय केले जिल्ह्यासाठी? अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव देऊ. ते चित्र महामार्गावरुनही सगळ्यांना दिसेल, असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात भांडणे लावून कोणाला फायदा होणार? पण, विरोधाचे निवेदन द्यायला कोण गेले होते? ही विकृती म्हणायची का? निवेदन देतानाचा बनकर यांचा फोटो मला दिसला. मग, बनकर विकृत आहेत का, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.
कास-बामणोली रस्त्याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तेथे सर्वेक्षण झाले आहे, डांबरीकरणाचे काम आता होणार नाही; परंतु पुलाचे काम लवकर होणे गरजेचे आहे. कास पठारावर जाळी बसवण्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, मला कुठेही अशा जाळ्या दिसलेल्या नाहीत. तशा जाळ्या कोणी बसवत नाही. फुलांचे परागीकरण होणे महत्त्वाचे अहसे. त्यामुळे आम्ही त्यावेळी विरोध केला होता. आताच्या जिल्हाधिकऱ्यांनीही पुन्हा जाळ्या बसवण्याचा प्रकार करू नये, अशी माझी विनंती आहे.
राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन येत नाही
सातारा लोकसभा मतदारसंघातील लोकांनी उदयनराजेंना घरी का बसवले? अगोदर दोन लाख 80 हजार मताधिक्य होते. ते तुटून 80 हजारांनी पराभव का झाला? तुम्हीच म्हणता ना राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन येत नाही, परंतु आता नगरपालिकेची सत्ता हातची जाऊ नये, कार्यकर्ते, बगलबच्चांची घरे चालावीत, म्हणून त्यांचा खटाटोप आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आ. गोरे यांच्याकडून विषयाला बगल
यावेळी उपस्थित असलेल्या आ. जयकुमार गोरे यांना शिवतीर्थाबाबत पश्न विचारण्यात आला असता, ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी त्यांचे मत मांडले आहे. मी सरकारमधील एक आमदार आहे. माझे म्हणणे एवढे आहे की, सगळ्यांना विश्वासात घेऊन, कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत. याची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पालकमंत्री काय म्हणाले, हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.
=========================





