Baramati : सोमेश्वरच्या सत्तेसाठी आरपारची लढाई! सांगता सभांना गर्दी; सभासदांच्या कौलाकडे लक्ष
Baramati : तीनही नेत्यांच्या सभांमधील उपस्थितीने राजकीय शक्तिप्रदर्शनाला महत्त्व आले असले, तरी या गर्दीचे मतांमध्ये किती रूपांतर होते, याचीच खरी परीक्षा आता होणार आहे.

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि युगेंद्र पवार यांच्या सांगता सभांना सभासदांनी गर्दी केल्याने निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे.
तीनही नेत्यांच्या सभांमधील उपस्थितीने राजकीय शक्तिप्रदर्शनाला महत्त्व आले असले, तरी या गर्दीचे मतांमध्ये किती रूपांतर होते, याचीच खरी परीक्षा आता होणार आहे.
कारखान्याच्या सत्तेसाठी यंदा वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमधून लढत उभी राहिली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत पॅनेल, पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनेल आणि युगेंद्र पवार यांची भूमिका यांमुळे निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सांगता सभांमधील गर्दीने वातावरण तापवले असले, तरी मतपेटीतून कोणाला किती पाठिंबा मिळतो, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नेत्यांची प्रतिष्ठा, पॅनेलची संघटनात्मक ताकद, स्थानिक समीकरणे आणि सभासदांशी असलेला थेट संपर्क या घटकांची प्रत्यक्ष मतदानात कसोटी लागणार आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, आता नजरा मतदानाकडे लागल्या आहेत. सभांच्या व्यासपीठावर झालेले शक्तिप्रदर्शन आणि मतदान केंद्रावर उमटणारा सभासदांचा कौल यांत किती अंतर राहते, हे निकालातून स्पष्ट होईल. त्यामुळे सोमेश्वरची ही निवडणूक केवळ कारखान्याच्या संचालक मंडळाची निवड न राहता, स्थानिक राजकीय प्रभाव आणि नेतृत्वाच्या स्वीकाराचीही परीक्षा ठरणार आहे.




