मोदी – मुइझ्झू यांच्यात विविध द्विपक्षीय मुद्यांवर झाली सविस्तर चर्चा

नवी दिल्ली : भारतभेटीवर आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यात आज विविध द्विपक्षीय मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करून हे संबंध अधिक बळकट करण्याच्या मुद्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
गेल्या नोव्हेंबरमध्ये मालदीवचे अध्यक्ष झाल्यापासून मुइझ्झू यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते भारत भेटीवर आले होते.
राष्ट्रपती भवनामध्ये स्वागत…
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू आणि त्यांच्या पत्नी ४ दिवसांच्या भारत भेटीवर काल संध्याकाळी भारतात दाखल झाले आहेत. विदेश राज्य मंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुइज्झू यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये मुइझ्झू यांचे औपचारिक स्वागत केले. त्यांना लष्कराची मानवंदना देखील देण्यात आली. त्यानंतर राजघाट येथे जाऊन मुइज्झू यांनी महात्मा गांधीच्या समाधीला आदरांजली वाहिली. हैदराबाद हाऊसमध्ये मुइझ्झू आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.





