पुणे जिल्हा | निवडणुकीबाबत चार दिवसांत निर्णय घेणार

कुरकुंभ, (वार्ताहर)- दौंड तालुक्यामध्ये महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुक्यातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणूक लढविणारच आहे.
त्यासाठी येत्या चार ते पाच दिवसांत निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. दरम्यान, थोरात यांच्या निर्णयामुळे आता इंदापूर पाठोपाठ दौंडमध्येही महायुतीत ठिणगी पडण्याचे संकेत मिळत आहेत.
थोरात म्हणाले की, तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी असे कार्यकर्ते जरी म्हणत असतील तरी त्यावर आता बोलणे मला उचित वाटत नाही. मी गेल्या ५० वर्षापासून राजकारणात आहे.शरद पवार हे आमचे दैवत आहेत. पुढच्या काळातही दैवतच राहतील, असे थोरात यांनी सांगितले.
शरद पवार आमचे दैवत
शरद पवार हे आमचे दैवत आहेत. महायुतीत दौंडची जागा ही भाजपकडे असू शकते. दौंडच्या जागेवर मी दावा करणे उचित होणार नाही. लोकांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.. आणखी जे गावे दौऱ्यात राहिली आहेत.
त्या गावात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलून आठवडाभरात भूमिका स्पष्ट करू. यासंदर्भात वरिष्ठांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, लोकांच्या इच्छेनुसार मला पुढे पाऊले टाकावे लागतील, असे माझे स्वतःचे मत आहे.
तुतारीसाठी कार्यकर्त्यांचा दबाव
माजी आमदार थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. थोरात यांनी दौंड तालुक्यातील गावोगावी दौरा सुरू केला असून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेत आहेत.
दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा अपक्ष लढवावी, असा कार्यकर्ते आणि समर्थकांचा त्यांच्यावर दबाव आहे.
अजित पवार यांना धक्का
लोकसभा निवडणुकीत एकत्र असलेले दोन नेते विधानसभेला विरोधात लढणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी, माजी आमदार रमेश थोरात यांनी वेगळी भूमिका घेतल्यास अजित पवारांना दौंडमधून धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. थोरात यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


