पुणे जिल्हा | दौंडच्या तालमीत इच्छुकांत संभ्रम ; थोरातांच्या कार्यकर्त्यांचा कल तुतारीकडे

पारगाव, (वार्ताहर)- दौंड येथील पवार पॅलेस या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या आदेशानुसार महा विकास आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती.
त्यात शरदचंद्र पवार पक्षाकडे दौंड तालुक्यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर केले. माजी आमदार रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. कारण थोरात यांच्या कार्यकर्त्यांचा तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा आग्रह आहे.
दौंड येथील बैठकीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, डॉ. भरत खळदकर, डॉ. वंदना मोहिते यांच्यासमवेत महाविकास आघाडीतील शिवसेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, आपचे रवींद्र जाधव, काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव खराडे,
शहराध्यक्ष हरिष ओझा, लोकजनशक्तीचे राहुल चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे शशांक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे अल्पसंख्याक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल खान,
पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले, महिला अध्यक्षा योगिनी दिवेकर, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, युवक अध्यक्ष सचिन काळभोर, प्रदेश सरचिटणीस अजित शितोळे, सोशल मीडियाचे अध्यक्ष चैतन्य पाटोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या आदेशानुसार आयात उमेदवारास उमेदवारी देण्यात येणार नसून एकत्रित दौंड तालुका संवाद यात्रेचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात संवाद यात्रेला सुरूवात झाली आहे.
आयातीस विरोध
बैठकीदरम्यान शिवसेना ऊबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे यांनी पाच निष्ठावंत कार्यकर्यां व्यतिरिक्त आयात उमेदवारास प्राधान्य दिल्यास आमचा विरोध असणार असल्याचा ठराव केला आहे. त्यास सर्वांच्या वतीने अनुमोदन देण्यात आले.
शेवाळेंचा आदेश अन् चलबिचल
राजकीय जाणकारांच्या मते अंतिम निर्णय हा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राहणार आहे. शिवाय दौंडच्या उमेदवारीचा विषय म्हणजे त्यांच्या घरच्या मतदारसंघातील विषय आहे.
पाटस या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रमेश थोरात यांचा आमच्याकडे अद्याप उमेदवारी मागणी अर्ज आलेला नाही. अर्ज आल्यास त्यावर विचार केला जाईल. त्यामुळे जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी दौंडच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला शब्द हा अंतिम शब्द राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





