जामखेड- नगर रस्त्यावरील अंबिका कला केंद्रातील एका नर्तिकेने जवळच असलेल्या एका लॉजवर छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि. 28) सकाळी घडली असून, रेखा सुभाष कोळी (वय 45, मांगडे चाळ, बार्शी, जि. सोलापूर, हल्ली मुक्काम, अंबिका कला केंद्र, जामखेड) असे आत्महत्या केलेल्या नर्तिकेचे नाव आहे. आत्महत्या केलेली नर्तिका नगर रस्त्यावरील कृष्णा हॉटेलच्या रूम नंबर 3मध्ये काल (दि. 27) दुपारी 2:30 पासून राहत होती. सकाळी रूम स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या हॉटेलमालक व या घटनेतील खबर देणारे तुकाराम रामराव ढोले यांच्याशी सकाळी 8:30च्या दरम्यान संवाद साधल्यानंतर काही वेळानंतर ही घटना घडली असावी, असा अंदाज हॉटेल मालक ढोले यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. यानंतर मृत नर्तिका रेखा कोळी हिस जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी भोस करत आहेत.