पिंपरी – जमिनीवर अतिक्रमण करून कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जुलै रोजी रावेत येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी शनिवारी (ता. 17) देहुरोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिश मोहन भालसिंग (वय 45, रा. देहुरोड) आणि त्याचे दोन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनोद तुकाराम आडसकर (वय 45, रा. आकुर्डी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आडसकर यांची रावेत येथील सर्वे नंबर 203 मध्ये जमीन आहे.
आरोपी अतिश याने या जमिनीवर अतिक्रमण करून आडसकर यांच्या कार्यालयाची व फलकाची तोडफोड केली. तसेच आडसकर यांना जमिनीवर प्रवेश करण्यास मनाई करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. आडसकर यांनी याबाबत तक्रारी अर्ज केला होता. अर्जाची शहानिशा करून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.