अयोद्धेतील रामलल्लाच्या पूजेचा महाराष्ट्रातील दाम्पत्याला मिळाला बहुमान; कोण आहे कांबळे दाम्पत्य?

Ram Mandir : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जगभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर राम मंदिराचा हा सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. यासाठी देशभरातील दिग्गज मंडळींसह अनेक लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील 11 जोडप्यांना या महापुजेचा मान मिळाला आहे. यात महाराष्ट्राच्या नवी मुंबईमधील दाम्पत्याचा देखील समावेश आहे. नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्य पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पूजा करणार आहेत.
विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे असे या दाम्पत्याचे नाव आहे. विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते, त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. विठ्ठल कांबळे हे विठ्ठल कांबळे हे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तसेच ते आरएसएसचे रायगड जिल्हा सेक्रेटरी देखील आहेत. आई-वडिलांमुळे घरात वारकरी संप्रदाय असल्याने अयोध्येच्या निमंत्रणाने कांबळे परिवार आनंदी झाले आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती. मात्र त्यांनाच निमंत्रण येईल आणि ते देखील थेट रामलल्लांच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. त्यामुळे आयुष्याचे सार्थक झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
11 दाम्पत्यांना करावा लागणार नियमांचे पालन
दरम्यान, अभिषेक करणाऱ्या 11 दाम्पत्यांनी 15 जानेवारीपासून नियमांचे पालन सुरु केलं आहे. या नियमांचे पालन केल्यावरच निमंत्रित जोडपी हा धार्मिक विधी पूर्ण करण्यास पात्र ठरतील. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या प्राणाचा अभिषेक होईल, त्यानंतरच जोडप्यांचा संकल्प आणि विधीही पूर्ण होतील.





