दोन आमदार आणि एका कॅबिनेट मंत्र्यांचा ताफा अडवला; मराठा समाज आक्रमक..

लातूर – राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली तारीख आज संपत आहे, तरीही सरकारकडून कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. तर दुसरीकडे अनेक गावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केलेली आहे. तसेच आमदारांचे ताफे अडवले जात आहेत.
अशीच घटना लातूर मध्ये निवाडा येथील रेणा साखर कारखाना येथे देशमुख कुटुंबियांनी हजेरी लावली. यावेळी लातूरमधील रेणापूर तालुक्यातील निवाडा येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजी केली.
अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मराठा समाजातील या दोन्ही आमदारांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचा आरोप करत मराठा समाजाकडून रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
अमित देशमुख काय म्हणाले ?
यावेळी आमदार अमित देशमुख यांनी जमलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुरुवातीला देखील अनेकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. पण त्यामध्ये अनेक मतमतांतरे होती. पण आम्ही तुमच्या भावनांशी एकरूप आहोत. म्हणूनच काँग्रेस पक्ष या आंदोलनाच्या पाठिशी आहे, असे अमित देशमुख म्हणाले.
कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचाही ताफा अडवला –
मराठा समाज राज्यभर आक्रमक झालेला पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील वाढवणा या गावानेही नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. वाढवणा हे गाव उदगीर विधानसभा मतदारसंघातील आहे. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मंत्री बनसोडे हे आज गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी मराठा आरक्षणासाठी साठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर मांडल्या.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी दिलेली तारीख आज संपत आहे. तर उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच मंत्री महोदयांनी गावात प्रवेश करावा असे जरांगे पाटील यांनी म्हंटेल आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी लोकप्रतिनिधींना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.





