छ. संभाजीनगर महापालिका निवडणूकीत 700 बोगस मतदार पकडल्याचा दावा; मुकुंदवाडीत राजकीय पक्षांचा राडा

छत्रपती संभाजीनगर: राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी ७०० बोगस मतदार पकडल्याचा खळबळजनक दावा राजकीय पक्षांनी केला आहे. विशेष म्हणजे, या मुद्द्यावर विरोधी पक्षातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेससोबतच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
शहरातील मुकुंदवाडी परिसरातील ‘ए-वन’ हॉटेल आणि राजर्षी शाहू शाळेच्या परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठ्या संख्येने संशयास्पद व्यक्ती मतदानासाठी आल्या होत्या. बोगस मतदानाचा संशय येताच ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. ठाकरे गटाने पोलीस आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे या दाव्याची शहानिशा केली जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून किंवा अधिकृत सरकारी यंत्रणेकडून अद्याप या ७०० बोगस मतदारांच्या आकड्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
115 जागेसाठी 859 उमेदवार मैदानात –
दरम्यान, ११५ जागांच्या संभाजीनगर महापालिकेसाठी एकूण ८५९ उमेदवार रिंगणात आहेत. ११ लाख मतदारांपैकी सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी १८ टक्के मतदान झाले होते. राज्याच्या अन्य भागातही बोगस मतदान आणि मतदार यादीतील घोळाच्या तक्रारी समोर येत आहेत. आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार असून, उद्या १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन शहरावर कोणाची सत्ता येणार, याचा फैसला होणार आहे.


