छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असतानाच, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज बायजीपुरा-जिन्सी भागात घडली. संतप्त जमावाने धावत्या वाहनातून जलील यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीमार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलील यांची रॅली बायजीपुरा परिसरातून जात असताना काही जणांनी सुरुवातीला काळे झेंडे दाखवून निषेध केला. मात्र, काही वेळातच शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जलील यांच्या गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असून, एमआयएमचा एक कार्यकर्ताही जखमी झाला आहे. इम्तियाज जलील यांनी या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. “शहरातील दोन मंत्र्यांनी (संजय शिरसाट आणि अतुल सावे) पाळलेल्या गुंडांनी हा हल्ला केला असून, कलीम कुरेशी याला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण आहे,” असा गंभीर आरोप जलील यांनी माध्यमांशी बोलताना केला. ‘पोलीस योग्य कारवाई करणार नसतील, तर आमचे आम्ही पाहून घेऊ’, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षांतर्गत नाराजी की विरोधकांचा बनाव? दुसरीकडे, हा हल्ला जलील यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेला ‘बनाव’ असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. एमआयएमने यावेळी २२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातून आणि पक्षांतर्गत असंतोषातूनच ही घटना घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हल्ला करणाऱ्या गटात पूर्वी एमआयएममध्ये असलेल्या आणि सध्या काँग्रेस व वंचितकडून निवडणूक लढवणाऱ्या कलीम कुरेशी यांच्या समर्थकांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात पोलीस बंदोबस्त तैनात या घटनेनंतर जलील समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने जिन्सी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक मागवून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राड्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.