केवळ पाच हजारांच्या हव्यासापोटी मुलाचा गेला जीव; पैसे मागणारी परिचारिका निलंबित

मैनपुरी – उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये नवजात अर्भकाच्या उपचाराच्या बदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या नर्सवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. या नवजात बालकाच्या मृत्यूनंतर परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे. परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात पीडितेच्या तक्रारीनंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि तपासणीत अनियमितता आढळून आल्यावर परिचारिकेवर कारवाई करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील कुर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील ओन्हा पटारा या गावातील रहिवासी असलेल्या सुजितने 18 सप्टेंबर रोजी प्रसूतीच्या त्रासामुळे पत्नी संजलीला करहलच्या सीएचसीमध्ये दाखल केले होते. येथे तैनात असलेल्या ज्योती व इतर कर्मचाऱ्यांनी पत्नीसोबत गैरवर्तन केले. १९ सप्टेंबरला पहाटे ४:३० वाजता त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला.
सुजीतने सांगितले की, प्रसूतीनंतर त्याच्याकडून ५ हजार रुपये मागितले गेले. पैसे न दिल्याने परिचारिका ज्योती हीने मुलाला कपड्यात गुंडाळून टेबलावर ठेवले आणि पैसे मिळेपर्यंत मूल सापडणार नाही, असे सांगितले.
नाईलाजास्तव कुटुंबीयांनी ज्योतीला पैसे दिले. दरम्यान, मूल सुमारे 40 मिनिटे टेबलावरच राहिले. त्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी बालकाला पाहिल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. हे पाहून मुलाला सैफई मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्याला सैफईला नेण्यात आले, मात्र त्याचा अगोदरच मृत्यू झाला होता.





