लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

मल्हारपेठ – निगडी (पुणे) येथील 27 वर्षीय युवतीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार युवतीने मल्हारपेठ पोलिसांत दिली असून याप्रकरणी हारूगडेवाडी (ता. पाटण) येथील संशयित स्वप्नील भरत कदम याच्यावर मल्हारपेठ पोलिसात कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीने तक्रारीत म्हटले आहे की, चाकण येथे 2019 मध्ये काम करत असताना एका युवकाशी ओळख झाल्यानंतर दोघांत चांगली मैत्री झाली. त्या युवकाने 2022 मध्ये त्याचा चुलत भाऊ स्वप्नील भरत कदम (हारूगडेवाडी) याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर स्वप्नील कदम व युवतीच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर एकमेकांशी दोघेही फोनवर बोलत. स्वप्नील कदम याने 13 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी चिखली, पिंपरी चिंचवड येथील त्याच्या घरी भेटायला बोलविले.
त्याठिकाणी स्वप्नीलने “तू मला आवडतेस, दोघे लग्न करूयात,’ असे सांगून इच्छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पिंपरी चिंचवड येथील लॉजवर वारंवार संबंध ठेवले. युवतीने स्वप्नीलला वारंवार लग्नाबाबत विचारणा केली असता स्वप्नीलने घरातील लोकांचा लग्नास विरोध आहे. त्यामुळे ती तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगितले. युवतीने नवारस्ता (ता. पाटण) येथे स्वप्नीलच्या घरी येऊन स्वप्नीलच्या घरातील लोकांशी लग्नाबाबत चर्चा केली असता त्यावेळेसही स्वप्नीलने आपण लग्न करूयात, तू काळजी करू नकोस, असे सांगून तिची खोटी समजूत काढली.
त्यानंतर युवती पुणे येथे जात असताना स्वप्नीलने पुन्हा तिला फोन करून थांबवले आणि लग्नाचे खोटे अमिष दाखवून तेलेवाडी (ता. पाटण) येथे युवतीची इच्छा नसतानाही जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. नंतर युवती पुणे येथे गेल्यावर काही दिवसांनी स्वप्नीलने मोबाइल बंद करून युवतीशी संपर्क केला नाही. स्वप्नीलच्या वडीलांशी फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनीही स्वप्नीलबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. युवती हारूगडेवाडी येथे आली. तिने स्वप्नीलच्या वडीलांशी भेटल्यावर त्यांनी “स्वप्नील कोठे आहे माहिती नाही. तुझे त्याच्याशी लग्न होऊ शकणार नाही. तुला जे काही करायचे आहे ते कर,’ असे सुनावले. त्यानंतर युवतीने तक्रार दाखल केली. मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर तपास करत आहेत.





