जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil – मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याने धाराशिवमध्ये पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव तसेच सातारा जिल्ह्यात देखील जरांगे यांच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले असतानाही धाराशिवमधील वाशीत जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण आप्पासाहेब देशमुख आणि संदीपान नामदेवराव कोकाटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत.
धाराशिवमधील वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे साताऱ्यात जरांगे पाटील यांच्या दोन सभांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे उशीरापर्यंत सभा घेतल्यामुळे आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात जरांगे पाटील यांची पहिली सभा ही खटाव तालुक्यातील मायणी आणि त्यानंतर मराठानगर, कराड, सातारा, मेढा, वाई, महाबळेश्वर आणि प्रतापगड येथे सभांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील मायणी आणि कराड येथे उशीरा सभा पार पडल्या. या ठिकाणच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभा पार पडत आहेत. ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आल्याने अनेकदा रात्रीच्या वेळीही सभा पार पडत आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. परंतु त्यानंतर जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर सोडणार नाही, असा इशारा देखील जरांगे पाटील त्यांच्या प्रत्येक सभेतून देत आहेत.
जरांगे यांची 19 नोव्हेंबरला रायगडमधील सभा उशारीपर्यंत झाली. त्यानंतर देहूमधील सभा त्यांनी मध्यरात्री घेतली. तसेच आळंदीमधील सभा पहाटे पावणे चार वाजता संपली. पण अद्याप या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील मनोज जरांगे यांच्या सभांचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे आहे.





