भर रस्त्यावर रक्तरंजित थरार…! दुचाकीला धक्का लागल्याने कार चालकाला चाकूने भोसकले

मुंबई : मुंबईमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपरजवळ दुचाकीस्वार आणि कारचालकात झालेल्या भांडणातून दुचाकीस्वाराने कारचालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर घडली आहे. झीशान शेख (वय-३६) असं मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, झीशान शेख विक्रोळी पार्कसाईट येथे राहात होता. रविवारी दुपारी तो त्याच्या मित्रासह पूर्व द्रुतगती मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जात होते. याच वेळी घाटकोपरजवळ एका स्कूटीवरून चाललेल्या दुचाकीस्वाराला त्यांच्या गाडीचा धक्का लागला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. दुचाकीस्वाराने त्याच्या दुचाकीत ठेवलेला सुरा बाहेर काढला आणि झीशानच्या छातीत खुपसला.
त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन झीशानचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे इत्यादी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तत्काळ हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी उपायुक्तांनी दहा पोलीस पथके तयार केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





