#IPL2022 #CSKvDC | डेव्हॉन कॉन्वेचं वादळी अर्धशतक, चेन्नईचा दिल्लीसमोर धावांचा डोंगर

मुंबई – डेव्हन कॉनवे, ऋतूराज गायकवाड, शिवम दुबे व कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवत चेन्नईच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. सलीमीवीर डेव्हन कॉनवे व ऋतूराज गायकवाड यांनी चेन्नईला शतकी सलामी दिली. ऋतूराज खेळपट्टीवर चांगला स्थिरावलेला असताना अनावश्यक फटका मारुन बाद झाला. त्याने आपल्या 41 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या.
दरम्यान कॉनवेने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शिवम दुबेच्या साथीत कॉनवेने संघाचे दीडशतक फलकावर लावले. शतकाकडे कूच करत असलेला कॉनवे अनावश्यक फटका मारून 87 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. दुबेही 19 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 32 धावांवर परतला.
त्यानंतर अम्बाती रायडू, मोईन अली व रॉबिन उथप्पा यांनी निराशा केली. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाला द्वीशतकी धावांची मजल मारुन दिली. धोनीने नाबाद 21 धावांच्या खेळीत अवघ्या 8 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार फटकावले. दिल्लीकडून अनरीच नोर्जेने 3 तर, खलिल अहमदने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 208 धावा. (डेव्हन कॉनवे 87, ऋतूराज गायकवाड 41, शिवम दुबे 32, महेंद्रसिंह धोनी नाबाद 21, अनरीच नोर्जे 3-42, खलिल अहमद 2-28).





