Rahul Gandhi : “निवडणुकांवरील बहिष्काराने लोकशाही संपुष्टात येईल” – राहुल गांधी
भारतीय जनतेला पूर्ण जाणीव होईपर्यंत आम्ही आमचे कार्य करत राहू, असे राहुल ठामपणे म्हणाले.

Rahul Gandhi – भारतीय लोकशाही पवित्र आहे. विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यास लोकशाही संपुष्टात येईल, अशी परखड भूमिका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात मांडली.
शिकागो विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतातील विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळली.
भारतात निवडणुकांशी संबंधित अनियमितता घडत असल्याचा आरोप कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. तसे असूनही निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा त्यांचा इरादा नाही. त्यासंदर्भात राहुल यांनी महत्वपूर्ण भाष्य केले.
निवडणुका न लढवण्याचा निर्णय आम्ही घेऊ; त्याच क्षणी आम्ही भारतीय लोकशाही संपुष्टात आणलेली असेल. लोकशाही रचना संपवण्याची आमची इच्छा नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
भारतातील विरोधक निवडणूक व्यवस्थाही मोडू इच्छित नाहीत. आम्ही निवडणुका न लढवण्याचे ठरवल्यास भारतीय जनतेच्या दृष्टीने त्या प्रक्रिया अवैध ठरतील. आम्हाला तशी स्थिती नकोय. विरोधकांना आता निवडणूक आयोगातूनच माहिती मिळत आहे.
सध्याच्या स्थितीत कार्य करणे अवघड बनत चालल्याची भावना आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे. सध्या जे काही चाललेयं ते चव्हाट्यावर आणण्याची कॉंग्रेस आणि विरोधकांची रणनीती आहे.
भारतीय जनतेला पूर्ण जाणीव होईपर्यंत आम्ही आमचे कार्य करत राहू, असे राहुल ठामपणे म्हणाले. त्यातून त्यांनी निवडणुकांमधील कथित अनियमिततांचा मुद्दा कॉंग्रेससह विरोधक लावून धरणार असल्याचे सूचित केले.






