पुणे | शहरात पावसाचा काहीसा शिडकावा ; दिवसभर ऊन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सलग तिसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका आणि कमाल तापमान ३२ अंशापर्यंत पोहचले होते. तर दुपारनंतर काही भागात पावसाचा शिडकाव पडला.
दरम्यान, अजूनही पुणे वेधशाळेकडून पुण्यात जोरदार पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील दोन दिवस शहरात आकाश ढगाळ आणि हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज वेधशाळेने दिला आहे.
निम्मा जुलै महिनाही संपत आला तरी अद्याप शहरात पावसाचा जोर वाढलेला नाही. एवढच काय तर शेतीसाठी आवश्यक पावसाची संततधारही नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आला. तर धरणक्षेत्रात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे चांगल्या पावसाच्या आगमनाकडे पुणेकर डोळे लावून बसले आहे.
गुरूवारी (दि. ११) सकाळपासून हवामान कोरडे, आकाश निरभ्र होते. त्यामुळे उन्हाचा चटका चांगला जाणवत होता. दुपारी तीन ते चार नंतर शिवाजीनगर, एनडीए, हडपसर, हवेली भागात पावसाची भुरभुर झाली.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील लोणावळ परिसरात सर्वाधिक ११ मिमी पावसाची नोंद झाली. तसेव लवासा येथे ८, गिरीवन आणि चिंचवड परिसरात प्रत्येकी ३, एनडीए येथे २ तर लवळे, दापोडी, खेड, हडपसर, शिवाजीनगर भागात १ मिमी पावसाची नोंद झाली.





