महायुतीला मोठा धक्का ! कोल्हापुरातील ‘हा’ नेता अजित पवारांची साथ सोडणार?

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या अगोदर लोकसभा निवडणुकीत बॅकफूटला गेलेल्या अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरातील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील हे महायुती सोडणार असल्याचे समजत आहे. तसे त्यांनी संकेतदेखील दिले आहेत.
कोल्हापूरातील बिद्री कारखान्यावरील कारवाई नंतर अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बिद्री कारखान्यावर राजकीय हेतूने कारवाई झाल्याचा आरोप करत माजी आमदार के पी पाटील यांनी मौन सोडले. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. आबिटकर यांनी कारखान्याच्या प्रगतीत खोडा घातल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. मी आता निवडणूक रिंगणात त्यांच्या विरोधात उतरणार असल्याचे आव्हान के. पी. पाटील यांनी दिले आहे.
लवकरच मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं ते म्हणाले. यापूर्वीही माझ्यावर असा प्रसंग आला होता. जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. माझा पक्ष आणि चिन्ह जनता आहे, असं म्हणत त्यांनी महायुती सोडण्याचे संकेत दिले आहेत. जर असे झाले तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे आता के. पी. पाटील यांच्या पुढच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





