पिंपरी | 80 पेक्षा अधिक वयाच्या 94 सेवानिवृत्तांना पेन्शनवाढीचा लाभ

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतून सेवानिवृत्त धारकांना पेन्शनवाढीचा लाभ दिला जाणार आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या सेवानिवृत्तांना पेन्शनमध्ये किमान 20 टक्के तर कमाल 40 टक्के वाढ दली जाणार आहे. 80 ते 95 वयोगटातील एकूण 94 सेवानिवृत्तांना ही पेन्शनवाढ दिल्याने महापालिकेच्या तिजोरीवर एकूण 27 लाख रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.
नगरविकास विभागाच्या वतीने काढलेल्या आदेशानुसार 80 वर्षांपुढील सेवानिवृत्तांना पेन्शनवाढ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने तसा ठरवा मंजूर केला असून, सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मुळ निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्ती वेतनात 1 जानेवारी 2024 पासून सुधारित करण्यात आले आहे.
मात्र, शासन निर्णयाचे पालन करत, महापालिका प्रशासन या सेवानिवृत्तांना जानेवारी 2024 पासूनच्या वाढीव पेन्शनची रक्कम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्तांवरील पेन्शनकरिता खर्च वाढतच जाणार असल्याचे कारण देत दोन महिन्यांचा फरक देण्याचे नाकारले आहे.
अशी आहे पेन्शनवाढ
सेवानिवृत्तांचे वय संख्या वाढ खर्च
80 ते 85 69 20 टक्के 18 लाख
85 पेक्षा अधिक ते 90 17 30 टक्के 6 लाख
90 पेक्षा अधिक ते 95 08 40 टक्के 9 लाख
95 पेक्षा अधिक ते 100 0 50 टक्के 0
100 पेक्षा अधिक वय 0 100 टक्के 0
एकही शतायुषी सेवानिवृत्त कर्मचारी नाही
महापालिकेने 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्तांना वाढीव पेन्शन देऊ केली आहे. यामध्ये 95 पेक्षा अधिक ते 100 वयोगटातील सेवानिवृत्तांना 50 टक्के तर 100 पेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्तांना 100 टक्के पेन्शनवाढ देऊ केली आहे. मात्र, 95 व वयाची 100 ओलांडलेला एकही सेवानिवृत्त कर्मचारी नसल्याची बाब उघडकीस आली आहे.





