पुणे | महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाषाण परिसरात मुंबई- पुणे महामार्गावर सुतारवाडीच्या बाजूच्या अनधिकृत हाॅटेल, शोरूम तसेच फर्निचरच्या दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून शुक्रवारी पुन्हा कारवाई करण्यात आली. यात ११ मिळकतींवर केलेल्या कारवाईत तब्बल ९० हजार चौरसफूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
याच भागात महापालिकेने या पूर्वी महामार्गाच्या पलिकडील फर्निचरच्या दुकानांवर उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर कारवाई केली होती. मात्र, या बाजूस कारवाई झालेली नव्हती. महापालिकेकडून कल्याणीनगर येथील पोर्शे अपघातानंतर शहरातील अनधिकृत हाॅटेल, पब तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई वाढवली आहे.
महामार्गाच्या बाजूला अनधिकृत बांधकामे झाली होती. ही बांधकामे “एचईएमआरएल’ या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येतात. याबाबत “एचईएमआरएल’कडून तक्रार करण्यात आली होती. या पूर्वी त्यांच्या तक्रारीनुसार, पश्चिमेकडील बांधकामे काढण्यात आली होती. तरख यावेळी पूर्वेकडील बांधकामे काढण्यात आली.
या मधील ७ मिळकतधारकांनी न्यायालयातून स्थगिती आदेश प्राप्त केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. पोलीस बंदोबस्तासह, १५ बिगारी, २ जाॅ कटर मशिन, दोन जेसीबी गॅस कटरच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.





