8th Pay Commission : DA दर तीन महिन्यांनी वाढणार? 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांची मोठी मागणी
8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगाकडे DA आणि DR दर तीन महिन्यांनी सुधारित करण्याची मागणी करण्यात आली आहे. 45 हजार किमान पेन्शन आणि 69 हजार किमान वेतनाचीही मागणी.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. वेतन आयोगाकडून देशातील विविध शहरांमध्ये बैठका घेतल्या जात असून कर्मचारी संघटनांकडून वेतन, पेन्शन आणि महागाई भत्त्याबाबत विविध मागण्या केल्या जात आहेत. यामध्ये महागाई भत्ता म्हणजेच DA आणि महागाई सवलत (DR) दर तीन महिन्यांनी सुधारित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमकी काय मागणी?
भारत पेन्शनर्स समाजाने 8व्या वेतन आयोगाकडे DA आणि DR ची दर तीन महिन्यांनी समीक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच DR 25 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास तो मूळ पेन्शनमध्ये विलीन करण्याबाबत विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महागाईचा परिणाम कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर कमी होण्यास मदत होईल, असा संघटनेचा दावा आहे.
भारत पेन्शनर्स समाज जवळपास 10 लाख पेन्शनधारकांचे प्रतिनिधित्व करते.
सध्या DA किती वेळा वाढतो?
सध्या केंद्र सरकारकडून DA आणि DR मध्ये वर्षातून दोनदा म्हणजेच दर सहा महिन्यांनी बदल केला जातो. जानेवारी ते जून या कालावधीसाठी साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये, तर जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये त्याचा आढावा घेतला जातो.
45 हजारांची किमान पेन्शनची मागणी –
भारत पेन्शनर्स समाजाने महागाईचा परिणाम लक्षात घेऊन दर तीन महिन्यांच्या सरासरीच्या आधारावर DA-DR ची समीक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच पॉइंट-टू-पॉइंट नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
संघटनेने 45 हजार रुपये किमान पेन्शन आणि 69 हजार रुपये किमान मूळ वेतन निश्चित करण्याची मागणी केली आहे. यासाठी 3.83 फिटमेंट फॅक्टर आणि 5.2 वेटेड-युनिट फॅमिली फॉर्म्युला वापरण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
याशिवाय वेतन आणि पेन्शनचा आढावा 10 वर्षांऐवजी दर पाच वर्षांनी घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
8व्या वेतन आयोगाची मुदत किती?
8व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. केंद्र सरकारने आयोगाला अहवाल साद करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे. आयोगाच्या बैठका पुढील काळात चेन्नई, पुडुचेरी, चंदीगड आणि जयपूर येथे होणार आहेत.
महत्त्वाचे: दर तीन महिन्यांनी DA वाढवण्याची मागणी सध्या कर्मचारी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य झालेली अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.





