Water storage : महाराष्ट्रातील धरणांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा; नागपूर विभाग पिछाडीवर
Water storage | Dam – गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे राज्यातील सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. राज्यातील पाणीसाठ्याची एकूण क्षमता ही १,२५४.६६ टीएमसी एवढी असून बुधवारी रात्री उशीरापर्यंत यापैकी सुमारे ८८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता, हे जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून दिसून आले आहे.
जलसंपदा विभागाने बुधवारी उशीरा आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बुधवारपर्यंत राज्यातील सर्वच धरणांमध्ये मिळून १,१३५.०४ टीएमसी पाणीसाठी जमा झाला होता. १ टीएमसी म्हणजे सुमारे २,८३१.६८ कोटी लिटर पाणीसाठा आहे. ही आकडेवारी एकूण क्षमतेच्या ८८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये ७६.०३ टक्के पाणीसाठा होता.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने धरण्यातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये केवळ नागपूर विभागामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर विभागामध्ये कमी पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली होती, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोकण विभागात गतवर्षी याच दिवशी ९४.०१ टक्के पाणीसाठा होता. यावेळी याच साठ्यामध्ये ०.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. पुणे विभागामध्ये गतवर्षी ९०.७३ टक्के पाणी साठा होता, तर यावर्षी यामध्ये सुमारे ३.७२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
नाशिक विभागामध्ये पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. गतवर्षी ७४.५७ टक्के पाणीसाठा होता. तर यावर्षी तब्बल ८.१७ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गतवर्षी याच दिवशी अवघा ५७.२४ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावेळी हा साठा ३१.७९ टक्क्यांनी वाढून ८९.०३ टक्के झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.





