पुणे | कचरा उचलण्यासाठी आता घरटी ८५ रु

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेतर्फे शहरात घरोघरी जाऊन स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांमार्फत कचरा संकलन केले जाते. त्यासाठी स्वच्छ संस्थेस वापरकर्ता शुल्क आकारण्यास मुभा दिली आहे. हे शुल्क या वर्षापासून ५ रुपयांनी वाढविण्यात आले आहे.
स्वच्छ संस्थेबाबत महापालिकेने सुधारित करार केला आहे. यानुसार ८० रुपयांचे शुल्क आता ८५ रुपये करण्यात आले आहे. तर व्यावसायिक वापरकर्ता शुल्क १७० रूपये आणि झोपडपट्टी भागात घरटी हे शुल्क महिना ६५ रुपये असणार आहे. सन २००८ पासून स्वच्छ संस्थेच्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त कचरा वेचकांकडून घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जातो.
दरमहा सेवाशुल्क आणि कचऱ्यातील रद्दी व भंगार साहित्य विक्रीतून कचरा वेचकांना आर्थिक हातभार लागतो. पूर्वीच्या कराराची मुदत संपल्यानंतर महापालिकेने २६ जानेवारी २०२४ ते २५ जानेवारी २०२९ या पाच वर्षासाठी स्वच्छ संस्थेला काम देण्यात आले आहे. त्यानुसार, सुधारीत दरवाढही देण्यात आली आहे.
स्वच्छच्या कामाची सद्यस्थिती
स्वच्छतर्फे संकलित येणारा कचरा – २२० टन
कचरा संकलनात येणाऱ्या मिळकती – १० लाख
स्वच्छचे कर्मचारी – ३,८५०
महापालिकेची दरवर्षी होणारी बचत – ११२ कोटी रु.




