नगर – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान

नगर – राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यावर ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या उत्पादकांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तसेच, नव्याने जाहीर झालेल्या अनुदानास साधारणतः एवढेच दूध उत्पादक पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुग्ध विकास विभागाला नवीन शासकीय निर्णयाची प्रतीक्षा लागली असून, त्यानंतर अंमलबजावणी होईल.
दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर घसरले आहेत. सद्यस्थितीतील गायीचे दूध २० ते ३० रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होते. राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी हा दर गृहित धरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची विधिमंडळात घोषणा केली. यापूर्वीही दूध उत्पादकांना अनुदान दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६७ कोटी १९ लाख ८१ हजार ५५५ रूपयांचे अनुदान दिले. जिल्ह्याबाहेरील काही शेतकरी जिल्ह्यातील दूध शीतकरण केंद्रांवर दूध घालतात. अशा शेतकऱ्यांना १५ कोटी ५९ लाख १७ हजार ८५ रूपयांचे अनुदान दिले आहे.
शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळण्यासाठी जनावरांचे भारत पशुधनवर नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी जनावरांचे इअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे इअर टॅगिंग राहिले आहे. त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रात जनावरांना घेऊन टॅगिंग करावे.
डॉ. सुनील तुंभारे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभागनगर्नगर
जिल्ह्यात यापूर्वी ७४ प्रकल्पांनी युझर आय.डी. आणि पासवर्ड दिले होते. ज्या दूध संकलन केंद्र किंवा शीतकरण प्रकल्पावर दहा हजारांपेक्षा जास्त दुधाचे संकलन होते. त्यांनी जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा. अन्न- औषधे प्रशासन विभागाचा परवाना, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र आणि दूध तपासणी करणारे ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक द्यावा
-डॉ. गिरिश सोनाने, जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी, अहमदनगर





