‘करोना’चा कहर : एकूण मृतांपैकी 38 टक्के मृत्यू सात दिवसांत
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “करोना’ने 11 मार्च रोजी प्रवेश केला. या 128 दिवसांमध्ये 9 हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी 211 रुग्णांचा “करोना’ने बळी घेतला. टक्केवारीच्या दृष्टीने एकूण रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी तीन टक्क्यांपेक्षाही कमी आहे, ही दिलासादायक बाब असली तरी “करोना’ने बळी घेण्याचा वेग मात्र वाढविला आहे, ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. गेल्या एका आठवड्यात एकूण मृत्यूंपैकी 36 टक्के मृत्यू झाले आहेत.
गेल्या 128 दिवसांमध्ये 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 120 दिवसांमध्ये 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जुलैपासून 17 जुलैपर्यंत 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जून महिन्याच्या मध्यापासून “करोना’ने उग्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. जूनच्या मध्यापासून “करोनाबाधितां’ची संख्याही मोठ्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यापासून तर रुग्णवाढ प्रचंड झाली.
सध्या रोज 4्र00 ते 500 रुग्ण आढळत आहेत. तसेच 15 जूनपासून रोज करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. 15 जूनपर्यंत शहरातील व शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रोज “करोना’ने बळी घेण्यास सुरुवात केली. परंतु रोज दोन किंवा तीन मृत्यू होत होते. जून महिन्यात 22 जून रोजी सर्वाधिक 4 मृत्यू झाले होते.
गंभीर होत आहे परिस्थिती
जुलै महिन्यात प्रचंड वेगाने रुग्णसंख्येत वाढ झाली असून महापालिकेच्या सर्व रुग्णालयांच्या रुग्णक्षमतेइतके रुग्ण दोनच दिवसात आढळत आहेत. यामुळे महापालिकेला ठिकठिकाणी कोविड सेंटर तयार करावे लागले आहेत. महापालिका सर्व रुग्णांना उपचार मिळावेत, या दृष्टीने प्रयत्न करत आहे, परंतु वाढत्या रुग्णसंख्येपुढे हे प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय राहणार नाही. खासगी रुग्णालयांची भरमसाठ बिले भरुन देखील बेड मिळणे अवघड होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजार होण्याची भीती व्यक्त केली होती. पहिल्या पंधरवड्यातच एकूण करोनाबाधितांचा आकडा दहा हजाराच्या जवळ जाऊन पोहचला आहे. आता जुलै अखेरपर्यंत एकूण रुग्णसंख्या 24 हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे आता नागरिकांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
जुलै महिना ठरला घातक
जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एकही मृत्यू न झाल्याने आता करोना आटोक्यात येईल असे वाटत होते. परंतु 2 जुलैपासून पुन्हा “करोना’मुळे मृत्यू होण्यास सुरुवात झाली. 2 जुलै रोजी एकूण मृतसंख्या 78 इतकी होती, त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये 133 मृत्यू झाले आहेत. याचाच अर्थ की जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चार महिन्यात झालेल्या मृत्यूच्या 63 टक्के मृत्यू झाले आहेत.