मुंबईत नाकाबंदीत सापडली 80 कोटींची चांदी; टेम्पोसह चालक ताब्यात

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या 4 दिवसांवर आली आहे. अशातच मुंबईत तब्बल 8 हजार 476 किलो चांदी जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका टेम्पोमधून ही चांदी जप्त केली आहे.
वृत्तानुसार, मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकनाका परिसरात लावलेल्या नाकेबंदीत शुक्रवारी रात्री उशिरा एक येथून वेगाने जात असताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्यामु्ळे त्यांनी त्याला थांबवले. त्याची तपासणी केली असता त्यात त्यांना सुमारे 8 हजार 476 किलो चांदी असल्याचे आढळले. सराफा बाजारात या चांदीची किंमत 80 कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसांनी टेम्पो चालकाला ही चांदी कुणाची आहे याविषयी चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी प्राप्तिकर विभाग व निवडणूक आयोगाला दिली आहे. प्राप्तिकर विभाग आता या चांदीचा मालक कोण? याचा तपास करत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारीही या घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तूर्त प्राथमिक तपासात या चांदीची वाहतूक बेकायदा होत असल्याचा संशय आहे.
चांदीच्या मालकीविषयी वेगवेगळ्या अटकळी –
दरम्यान, 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. तूर्त राजकीय पक्षांकडून प्रचाराला मोठी धार आली आहे. सर्वच पक्ष मतदारांना वेगवेगळी आश्वासने देऊन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच चांदीचे एवढे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागल्यामुळे तिच्या मालकीविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.





