मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातात 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई : मुंबईच्या भिवंडीमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. येथे खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 10 ते 12 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा या गावाजवळ 25 एप्रिलच्या रात्रीच्या सुमारास घडला आहे.
या अपघातातील जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती आहि की, खडवली येथे पिकनिकसाठी गेलेल्या भिवंडीतील कुटुंबियांचा अपघात होऊन यात 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. तर यातील जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर या भीषण अपघातात एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या खाजगी बस मध्ये 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भरधाव वेगात बस असल्याने बस चालकाला अंदाज न आल्याने बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकून मोठा अपघात झाला. सध्या जखमींना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





