देशात 2020 मध्ये ड्रंक ड्रायव्हिंगमुळे 8 हजार 355 रस्ते अपघात

नवी दिल्ली – देशात 2020 यावर्षी 3 लाख 66 हजारहून अधिक रस्ते अपघात झाले. त्यातील 8 हजार 355 अपघात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने (ड्रंक ड्रायव्हिंग) घडले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात 2020 मधील अपघातांविषयीची माहिती दिली. देशात सिग्नल तोडण्याच्या कारणामुळे 2 हजार 721 अपघात झाले.
वाहन चालवताना मोबाईल फोनवरील बोलणे 6 हजार 753 अपघातांचे कारण ठरले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) टोल नाक्यांवरून 2020-21 या आर्थिक वर्षात 27 हजार 744 कोटी रूपयांचे शुल्क गोळा झाले. तर, 2021-22 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 25 हजार कोटी रूपये शुल्क मिळाले.
सरकारला नॅशनल परमिट जारी करण्याच्या प्रक्रियेतून मागील आर्थिक वर्षात 1 हजार 636 कोटी रूपयांचा महसूल मिळाला, असेही गडकरी यांनी नमूद केले.





