राज्यात एप्रिलमध्ये 8 हजार 259 बेरोजगारांना रोजगार

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात एप्रिल 2021 मध्ये 8 हजार 259 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2020 मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर 52 हजार 169 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने ‘महास्वयंम’ हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
89 हजार उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 89 हजार 668 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. हे उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच विभागाच्या ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
मुंबईत एप्रिलमध्ये 3 हजार 995 बेरोजगारांना रोजगार
मंत्री मलिक म्हणाले की, माहे एप्रिल 2021 मध्ये विभागाकडे 19 हजार 055 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात 5 हजार 809, नाशिक विभागात 2 हजार 757, पुणे विभागात 4 हजार 997, औरंगाबाद विभागात 3 हजार 370, अमरावती विभागात 1 हजार 144 तर नागपूर विभागात 978 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे एप्रिलमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 8 हजार 259 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 3 हजार 995, नाशिक विभागात 1 हजार 302, पुणे विभागात 1 हजार 757, औरंगाबाद विभागात 869, अमरावती विभागात 314 तर नागपूर विभागात 22 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.





