सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येतीय. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगानं बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेबाबत मात्र अद्यापही सस्पेन्स कायम आहे. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा सुरू होणार आहे. तसेच दोन्ही पक्ष स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करणार असल्याची माहिती समोर आलीय . ======================== काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालंय. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली होती. शिवराज पाटील हे लातूरच्या चाकूरमधील प्रभावी काँग्रेस नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा विजय मिळवला होता. ======================== राज्यात थंडीचा कडाका वाढला राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.आज मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर परभणीचे तापमान ५.५ अंशांवर नोंदवले गेले आहे, आणि त्यामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे ===================== ‘त्यांनी’ थोडी लाज बाळगून टीका करायला हवी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालपासून सुरू असलेल्या वादात शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली. ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? असा टोला शिंदेंनी लगावला. मात्र वादळीणवार झालेली ही टीका ठाकरेंपुत्र आदित्य ठाकरेंना सहन झाली नाही त्यांनी एकनाथ शिंदेंना थोडी लाज बाळगून टीका करायला हवी होती असं म्हणत त्यांचा समाचार घेतला. तसेच यांना आमदार कोणी केला असा सवाल करत आत हेच विषारी साप आता अॅनाकोंडाला चावायला निघाले आहेत, अशा शब्दात आदित्य यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. ==================== केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था असल्याचे प्रकरण समोर आलं आहे. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिवृष्टी अनुदानावरुन खडाजंगी पाहायला मिळाली. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालं असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आला. त्यावरुन आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. कृषीमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचं ओमराजे यांनी म्हटलंय. महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मागणारा प्रस्ताव आला आहे, असे असत्य विधान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केल्याचा आरोप करत ओम राजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला आहे. या हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे, अरविंद सावंतसह 25 खासदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येतंय. ============================ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून बातचीत केली. या चर्चेवेळी उभय नेत्यांनी भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीची समीक्षा केली. तसेच प्रत्येक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य सतत मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत या चर्चेची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये “अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर माझी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेवेळी आम्ही द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली. भारत व अमेरिका जागतिक शांतता, स्थैर्य व समृद्धीसाठी एकत्र मिळवून काम करत राहतील.” असं म्हटलंय. ================== उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दिल्लीतील कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी उमर खालिद याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांनी उमर खालिद याला 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी जामीन मंजूर केला. उमर खालिद याचा अंतरिम जामीनाचा अर्ज 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि 2 जामीनदारांच्या हमीवर हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. उमर खालिद याला जामिनाच्या कालावधीत फक्त त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना भेटता येईल. जामीन कालावधीत उमर खालिद यानं त्याच्या घरी किंवा ज्या ठिकाणी बहिणीचं लग्न पार पडणार आहे त्या ठिकाणी थांबावं, असं कोर्टानं म्हटलं. ======================= मेक्सिकोनेही भारतावर ५० टक्के कर लादला अमेरिकेने भारतावर अद्यापही ५० टक्के आयातशुल्क लादले असल्याने याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. मात्र, आता भारताला आणखी मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेनंतर आता मेक्सिकोनेही भारतासह काही देशांवर ५० टक्के कर लादला आहे. मेक्सिकोचा ज्या राष्ट्रांबरोबर कोणताही औपचारिक व्यापार करार (एफटीए) नाही, अशा राष्ट्रांकडून आयात होणाऱ्या हजारो उत्पादनांवर मेक्सिको आयात शुल्क वाढवण्याची तयारी करत आहे. मेक्सिकोच्या या निर्णयाचा फटका भारतातील अनेक क्षेत्रांतील निर्यातदारांना बसणार आहे, विशेषतः ऑटोमोबाईल, ऑटो पार्ट्स, अभियांत्रिकी उत्पादने, रसायने, स्टील, यंत्रसामग्री आणि ग्राहक केंद्रित उत्पादन क्षेत्रांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. ============================ फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी ३ दिवस भारत दौऱ्यावर आता बातमी फुटबॉल चाहत्यांसाठी…जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी उद्यापासून ३ दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहे. मेस्सी भारतात येत असल्यानं फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह शिगेला पोहचलाय. या ३ दिवसात मेस्सी भारतातील ४ प्रमुख शहरांना भेट देणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यात कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीचा समावेश असून याठिकाणी मेस्सीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. मेस्सी त्याच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. कोलकातामध्ये मेस्सी स्वतःच्या ७० फुटी पुतळ्याचे करणार अनावरण करणार आहे. तर हैदराबादमध्ये एक चॅरिटी फुटबॉल मॅच तो खेळणार आहे. त्यासोबतच मुंबईत सुद्धा २ कार्यक्रमांना तो हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जातंय. ================== शुभांगी सदावर्तेनं केलं दुसरं लग्न ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं दुसरं लग्न केलंय. शुभांगीच्या लग्नाची बातमी कळताच चाहत्यांनाही आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण डिवोर्सनंतर चार महिन्यातच अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं दुसरं लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. शुभांगीने निर्माता सुमीत म्हशेळकर बरोबर दुसरं लग्न केलं. 5 डिसेंबर 2025 रोजी शुभांगी आणि सुमीत यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये शुभांगीनं लग्न केलं. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करताना शुभांगी आणि सुमीत यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. याठिकाणचे फोटो शार करत शुभांगीने कॅप्शनमध्ये , “स्वामी म्हणतात.. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे, ते चांगल्यासाठीच…”असं तिने लिहीत नव्या आयुष्याची सुरुवात केल्याचं म्हटलंय.