Railway Employee : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ‘त्या’ निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली – रेल्वे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी 78 दिवसांचा पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस देण्याच्या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.
दर वर्षी दसरा पूजेच्या सुट्ट्यांच्या आधीच पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येतो. यावर्षी देखील रेल्वेच्या सुमारे 11 लाख 27 हजार अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे.
पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला देण्यात येणारी 78 दिवसांसाठीची सर्वाधिक रक्कम 17,951रुपये इतकी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली 78 दिवसांच्या बोनसची अंदाजित रक्कम सुमारे 1832.09 कोटी रुपये इतकी आहे. कोविड-19 नंतर उद्भवलेल्या विपरीत आर्थिक परिस्थितीत देखील बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.





