Cough syrup : पाटण्यात कफ सिरपच्या 7,500 बाटल्या जप्त; दोघांना अटक
मादक पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या सीमापार आणि देशांतर्गत तस्करीला आळा घालण्यासाठी डीआरआयच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

Cough syrup – अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने कोडीन आधारित कफ सिरपची मोठी खेप अवैधरित्या वळवण्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 26 मे रोजी पाटणा येथील राजेंद्रनगर टर्मिनल रेल्वे स्थानकाच्या परिसराबाहेर एक टाटा इंट्रा पिकअप ट्रक अडवला आणि त्यातून कोडीन फॉस्फेट आणि ट्रायप्रोलिडाइन हायड्रोक्लोराइड सिरपच्या 7,500 बाटल्या जप्त केल्या आहेत.
या कारवाईत दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. यांनी या कोडीन-आधारित सिरपच्या पावत्यांसोबत एक कंसाइनमेंट नोट सादर केली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी केली, ज्यात उघड झाले की माल स्वीकारणाऱ्याचा औषध परवाना रद्द करण्यात आला होता आणि दिलेल्या पत्त्यावर ती कंपनी अस्तित्वात नव्हती.
कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जप्त केलेले कफ सिरप आणि पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आणि पकडलेल्या दोन व्यक्तींना एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.
मादक पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या सीमापार आणि देशांतर्गत तस्करीला आळा घालण्यासाठी डीआरआयच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. पुरवठा साखळी, आर्थिक संबंध आणि कंपन्या व व्यक्तींच्या सहभागाबाबत पुढील तपास सुरू आहे.





