पुणे जिल्हा | लाडकी बहीणसाठी ७५ हजार अर्ज सादर

बारामती,(प्रतिनिधी)- महसूल पंधरवड्यादरम्यान राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पंधरवडा यशस्वी करण्याकरीता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गतीमान पद्धतीने काम करावे; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ७५ हजार अर्ज सादर केले आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
प्रशासकीय भवन येथे आयोजित महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यंत्र्याचे खासगी सचिव हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, भुमीअभिलेख उपअधीक्षक संजय घोंगडे आदी उपस्थित होते.
नावडकर म्हणाले, उपविभागीय कार्यालयाच्यावतीने एप्रिल २०२३ पासून नागरिकांना जवळपास ४९ हजार तर तहसील कार्यालयाने ९७ हजार दाखले उपलब्ध करुन दिले आहे. उपविभागीय कार्यालयाच्या वतीने ३८३ विविध प्रकरणांचे निकाल दिले आहे. रेल्वेच्या मार्गिकेचे भूसंपादन, संत तुकाराम पालखी मार्ग, जन्म-मूत्यूच्या नोदीं असे विविध काम महसूलच्या वतीने करण्यात येत आहे.
ते म्हणाले की, महसूल ई-प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा, महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, पंधरवडा वार्तालाप, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, विभागाच्या विविध योजनांचा लाभ, दाखल्यांचे वितरण आणि सेवा सुविधांची माहितीही देणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेल्या विविध लोककल्याणकरी योजनेचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळवून देण्याकरीता काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. राठोड, शिंदे, डॉ. बागल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्याचे वितरण करण्यात आले.
सर्व घटकांना न्यायाची भूमिका आवश्यक
हनुमंत पाटील म्हणाले, गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व विभागाशी निगडित महसूल विभाग समन्वयाने काम करीत असते. जन्म ते मृत्यूपर्यंत सर्व प्रकारचे दाखले, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळी परिस्थिती, अवर्षण, निवडणूक यासारखी विविध महत्वाची कामे या विभागामार्फत केली जातात.
त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा विश्वास आहे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असावी,





