विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळेतील किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. उपस्थिती कमी असल्यास विद्यार्थ्यांना या दहावी, बारावीच्या परीक्षेस बसता येणार नाही.
या सूचनांनुसार दहावी आणि बारावी हे दोन वर्षांचे शैक्षणिक कार्यक्रम आहेत. दहावीची परीक्षा द्यायची असल्यास विद्यार्थ्याने नववी आणि दहावी असे दोन्ही वर्ग शिकलेले असणे बंधनकारक आहे. बारावीची परीक्षा देण्यासाठी अकरावी व बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे.
केवळ अंतिम वर्षी शिकून परीक्षा देता येणार नाही, असा इशाराही देण्यात आलेला आहे. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अंतर्गत मूल्यमापन हा परीक्षेचा अविभाज्य घटक असून तो दोन वर्षांच्या कालावधीत सातत्याने केला जाणार आहे. विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिल्यास त्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. या संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे.
परीक्षेस बसण्याचा अधिकार केवळ शाळेत नियमित उपस्थिती लावणाऱ्या आणि सर्व निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच असणार आहे. शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी नियमित शालेय शिक्षणाला प्राधान्य द्यावे, यासाठीच या अटी घालण्यात आल्या आहेत.





